धाराशिव प्रतिनिधी . (राहुल कांबळे)
धाराशिव दि.२७ मार्च (जिमाका) युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळून त्यांची रोजगारसंधी वाढावी यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत,शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये रुजू झालेल्या आणि ६ महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कालावधी ५ महिने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेचा एकूण प्रशिक्षण कालावधी ११ महिने करण्यात आला आहे.
१० मार्च २०२५ पर्यंत ६ महिने पूर्ण झाले नसतील,तर रुजू झालेल्या दिनांकापासून ११ महिने प्रशिक्षण कालावधी राहील. यापुढे अधिक मुदतवाढ दिली जाणार नाही,तसेच यामुळे कायमस्वरूपी नोकरीचा हक्क निर्माण होणार नाही.
प्रशिक्षणार्थ्यांनी http://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील (Intern Login) > My Profile Tab येथे आपली माहिती अद्ययावत करावी.६ महिने पूर्ण केलेल्या उमेदवारांनी संबंधित आस्थापनांशी संपर्क साधावा व ३० एप्रिल २०२५ पर्यंत उर्वरित ५ महिन्यांसाठी रुजू व्हावे.
काही तांत्रिक अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव येथे संपर्क साधावा.असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी कळविले आहे.
****