धाराशिव | 9 एप्रिल 2025
स्वातंत्र्यसैनिकाच्या बनावट नामनिर्देशन पत्राच्या आधारे तब्बल 31 वर्षे शासकीय सेवेत राहून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप बब्रुवान नामदेव साबळे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तक्रारदार राजाभाऊ राऊत, जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांनी दिला आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी धाराशिव यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बब्रुवान साबळे यांनी 22 जून 1993 रोजी स्वातंत्र्यसैनिकाच्या कोट्यातून बनावट नामनिर्देशन पत्राच्या आधारे लेखापाल पदावर शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीतील चांभार वर्गाचे आरक्षण घेत तीन बेकायदेशीर पदोन्नती मिळवून सेवा पूर्ण केली आणि 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.
राजाभाऊ राऊत यांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भातील तक्रार त्यांनी 4 ऑगस्ट 2023 रोजी केली होती. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2024 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी दिलेल्या अंतिम चौकशी अहवालात साबळे यांचे नामनिर्देशन पत्र नियमबाह्य असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
तरीही, अद्याप कोणतीही फौजदारी कारवाई झाली नसल्याने प्रशासनाने हेतुपुरस्सर प्रकरण दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात असेही नमूद आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयानेच नामनिर्देशन पत्राच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे, यासंबंधित प्रशासकीय नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने फसवणुकीचा गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे.
मुख्य मागण्या:
• बब्रुवान साबळे यांच्याविरुद्ध त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा
• सेवाकालातील मिळालेल्या सर्व आर्थिक लाभांची वसुली करण्यात यावी
• अन्यथा 01 मे 2025 (महाराष्ट्र दिन) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल
सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे.