spot_img
spot_img
spot_img

“अण्णा भाऊ साठे आणि आधुनिक विचार”

“अण्णा भाऊ साठे आणि आधुनिक विचार”

प्रा डी डी मस्के

तुकाराम अर्थात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे झाला व त्यांचा मृत्यू १८ जुलै १९६९ ला मुंबईत झाला. उणे पुरे पन्नास वर्षाचे आयुष्य अण्णा भाऊला लाभले. अण्णाभाऊ हे एक असे साहित्यिक आहेत की ज्यांचा पुतळा परदेशात उभारला गेलेला आहे. अण्णाभाऊंनी कथा,लघुकथा,कादंबरी,वगनाट्य, लावणी, चित्रपट कथा,पोवाडा, प्रवास वर्णन असे विविध साहित्यप्रकार प्रभावीपणे हाताळले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अजरामर झाले.

“बालपणाची जडणघडण”

दहा-बारा वर्षाचा तुकाराम मुंबईच्या दिशेने निघाला होता त्याचवेळी किंवा त्याच दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे दुःख दैन्य मांडून त्यांच्या हक्कांसाठी लढत होते. मुंबईच्या वास्तव्यामध्ये अण्णाभाऊंनी कामगार चळवळ अतिशय जवळून पाहिली. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा राहण्यापूर्वीच हा वाटेगाव चा तुकाराम कम्युनिस्ट विचारसरणीचा अनुयायी बनला. पॅम्पलेट्स वाटणे,हॅण्डबिल वाटणे,मोर्चे,संप,हरताळ यशस्वी करण्याच्या दृष्टीने पोस्टर्स रंगविणे, डकविणे,रस्त्यावर घोषणा लिहिणे, सभा संमेलनाच्या आयोजन करणे अशी अनेक कामे लहान मुलेच करायची तुकाराम यात रंगून गेला व कमालीच्या वेगाने बदलत राहिला. याच काळात तो साक्षर झाला.

तुकाराम मुळचाच गोड गळ्याचा होता, लोकगीते व लोककथांचा फार मोठा साठा तुकारामच्या ओठावर होता, तल्लख बुद्धीचा तुकाराम थोड्याच दिवसात मुंबईतील कम्युनिस्ट विचारसरणीच्या तरुण वर्तुळात आवडता बनला, ठरल्यावेळी तो आला नाही तर त्याचे तरुण सहकारी धावत यायचे घराच्या बाहेर उभा राहून पुकारायचे तुकाराम…. जाई व शंकर ही भावंडे घराच्या बाहेर येऊन पाहायचे अन जाई म्हणायची अण्णा घरात नाही तर शंकर म्हणायचा भाऊ घरात नाही मग अनेकांना हा अण्णा कोण हे उमगायचेच नाही.नागपूरच्या दिनकर नावाच्या तिक्ष्णबुद्धीच्या तरुणाला हे नाव ठीक वाटले आणि त्या वेळपासून वाटेगावचा तुकाराम भाऊ साठे हा मुंबईत अण्णा भाऊ साठे या नावाने ओळखला जाऊ लागला “तुकाराम”चे “अण्णा” हे नामांतरच झाले नाही तर अण्णा भाऊंचे वाटेगाव ते मुंबई हे जाणीवांतर ही झालेले दिसते.

गुणवत्ता आणि प्रतिभा ही विशिष्ट जातीची किंवा धर्माची मक्तेदारी नसते हे आपल्या लेखणीने यांनी सिद्ध करून दाखविले. जगद्गुरु संत तुकारामांनी “तुकाराम गाथा” लिहून समाजातील अंधश्रद्धा, विषमता यावर कोरडे ओढले तर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धा,विषमता,वर्ग व्यवस्था यावर कथा,कादंबरी,लोकनाट्य व पोवाडा या माध्यमातून कोरडे ओढले. म्हणजेच अण्णा भाऊंनी बहुजन गाथा मांडली असे प्रा.शरद गायकवाड यांनी नोंदवले आहे.

चळवळीतील जडण घडण

अण्णाभाऊंची जडणघडण साम्यवादी चळवळीमध्ये झालेली आहे. मुंबईच्या कामगार वस्तीमध्ये होणारे संप,मोर्चे, हरताळ यांचे कामगारांच्या जीवनावर होणारे उलट सुलट परिणाम हे लहानपणीच अण्णाभाऊंच्या मनावर बिंबवलेले होते. १९४४ साली टिटवाळा येथे शेतकरी परिषद भरली होती या शेतकरी परिषदेमध्ये अण्णाभाऊ साठे,अमर शेख,ग.ना गव्हाणकर या तिघांनी मिळून “लालबावटा कला पथका”ची स्थापना केली. या कला पथकाच्या माध्यमातून श्रमिक,शेतमजूर,दलित यांच्यामध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्याचं काम केलेले दिसते.

याच शाहिरी त्रिकुटाने संयुक्त महाराष्ट्राचे चळवळ गाजवली. याच चळवळीतील “माझी मैना गावाकडे राहिली” ही अण्णाभाऊंची लावणी अजरामर झालेली दिसून येते. पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अण्णाभाऊ साठे हे दुर्लक्षित राहिलेले दिसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान हे विसरता येत नाही.

विज्ञानवादी दृष्टिकोन

अण्णा भाऊंनी साहित्यातून आणि वाणीतून वैज्ञानिक दृष्टिकोन मांडलेला दिसून येतो. पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना उद्घाटक म्हणून अण्णाभाऊंनी,” पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे.” हा विचार मांडला त्यांचा हा विचार प्रस्थापित व्यवस्थेला हादरवणारा आहे. दुसरे असे की तमाशा मधून म्हणजेच लोकनाट्य मधून सुरुवातीला गणेशाला नमन किंवा वंदन करण्याचा पायंडा होता. सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक येथील श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी उर्फ पट्टे बापूराव यांनी गणपती स्तवन हे तमाशामध्ये आणले होते ते अण्णाभाऊंनी बंद केले.तो पायंडा किंवा प्रथा अण्णाभाऊंनी मोडली. म्हणजेच अण्णा भाऊंनी देव, अंधश्रद्धा नाकारले असेच म्हणावे लागेल अण्णाभाऊंनी गणपती नाकारला हे अण्णाभाऊंच्या अनुयायांनी गणेशोत्सवात भाग घेताना लक्षात घेतले पाहिजे. हे प्रस्थापित रूढी,परंपरा,प्रथा नाकारताना अण्णाभाऊंनी काय स्वीकारलं हे लक्षात घ्यावे. त्यांनी गणपती नाकारला आणि मातृभूमी, महापुरुष,कष्टकरी,श्रमिक यांना वंदन केले.

*साहित्यातून संदेश*

अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून कोणता संदेश दिला हे ही विचारातील घेतले पाहिजे. एक-दोन दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ यांनी मुंबईमध्ये हमाली, कुत्री सांभाळणारा,लाईटीच्या तारा ओढणारा, सिनेमाची पोस्टर लावणारा,गिरणी कामगार, पाईपलाईनचे खड्डे खोदणारा, लोकांची वसुली करून देणारा दादा अशी अनेक प्रकारचे कामे करून ते अनुभव संपन्न झाले होते याचे प्रतिबिंब त्यांच्या अनेक साहित्यकृती मधून दिसून येते. त्यांनी जवळपास ९७ साहित्यकृती निर्माण केल्या. अण्णाभाऊंनी आपले साहित्य मन,मनगट,मनका व मस्तक मजबूत करण्यासाठी लिहिलं. अण्णाभाऊंनी क्रांतिकारी साहित्य निर्माण केले त्यांचे नायक बंडखोर होते. काहीच न शिकलेल्या अण्णाभाऊंनी रशियातील मास्को शहरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे यातच त्यांचे मोठेपण आपल्याला दिसून येते.

प्रस्थापित साहित्यिक शृंगारिक लावण्या लिहीत होते तर अण्णाभाऊ मुंबईची लावणी लिहीत होते. म्हणजेच अण्णाभाऊंनी प्रस्थापित साहित्यिकांनाही चपराक दिलेली दिसते. आज आर.एस.एस.व सावरकर भक्तांच्या नादाला लागलेल्या अनुयायांनी अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून काय सांगत होते हे नीट समजून घ्यावे.”शिवारी चला” या पद्य रचनेत अण्णाभाऊ म्हणतात की,

सावरकर शाहीचा विखारी कुंदा

आरपार खुरपून पाडायचा रेंदा

दाखवया बाळा …उचल घे वेळा

पोलादी पाहून आपला रे शिवारी चला ||

सावरकर शाही चा कुंदा मुळासकट खुरपून काढण्यासाठी हातात वेळा घे असे अण्णाभाऊ का म्हणतात हे आपण हुशारीने जाणून घेऊन सद्यस्थितीत विचार करणे आवश्यक वाटते.

तुम्ही चळू नका

कोणी वळू नका

मागं पळू नका

बिनी मारायची अजून राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

अण्णाभाऊंना कोणती बिन्नी मारायची होती याचा विचार आपण केला पाहिजे. अण्णाभाऊ असं का म्हणाले?

जग बदल घालुनी घाव

सांगून गेले मला भीमराव

हा घाव कशावर घालायचा होता? याचा विचार आपण अण्णाभाऊच्या सर्व अनुयायांनी करणे आवश्यक आहे.

आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती महाराष्ट्रभर साजरी केली जात असली तरी त्याची सुरुवात १९८२ साली झालेली दिसते. त्यांची “फकीरा” ही कादंबरी २८ भाषेतून प्रकाशित झालेली दिसून येते यावरून त्याची लोकप्रियता, त्या साहित्यकृतीचा दर्जा लक्षात येतो. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. बाबासाहेबांची कोणती लेखणी. तर ती संविधान लिहिलेली लेखणी होती हे लक्षात घ्यावे. “फकीरा”ची अर्पण पत्रिका आणि “जग बदल घालूनी घाव” हे प्रेरणा गीत हे दोन दुवे या दोन जातींना एकत्र आणण्याचा एक महत्त्वाचा वैचारिक धागा आहे असे नमूद करावेसे वाटते.

प्रा. डी.डी. मस्के  बार्शी, मो.न.9423609218,9881426933

Related Articles

ताज्या बातम्या