धाराशिव प्रतिनिधी .कनगरा येथील गट क्र.१७१ मधील सरकारी जागेवर झालेल्या अतिक्रमण प्रकरणात महसूल विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. उपअधीक्षक भूमि अभिलेख धाराशिव दिलीप मोरे यांनी संबंधित प्रकरणी नोटीस बजावून व चौकशी आदेशित केली
सदर प्रकरणात गावातील श्री.मोहन सुरवसे व इतरांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गट क्र. १७१ मधील जमिनीवर नगर रचनाकार यांच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बांधकाम व वापर सुरू केल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या बैठकीत तातडीने तपास व कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात आला.
महसूल विभागाने पंचनामे, जमीन नोंदी व चौकशी अहवालांच्या आधारे ही जागा सरकारी असल्याचे स्पष्ट केले असून, अतिक्रमण करणाऱ्यांना जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, प्रकरणाची पूर्ण छाननी होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा वापर थांबविण्यासही निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारीत नमूद व्यक्तींनी ९ ऑगस्ट २०२५ रोजीही संबंधित जागेवर बेकायदेशीर हालचाली सुरू ठेवल्याने, महसूल अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पुढील कार्यवाहीसाठी संयुक्त पथक तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलीस ठाण्याचे निरीक्षक व संबंधित विभागीय अधिकारी यांना समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई महसूल, पोलिस व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने करण्यात येणार असून, सरकारी जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी ही मोहीम कायम ठेवली जाणार आहे, असे उपअधीक्षक भूमिअभिलेख दिलीप मोरे यांनी स्पष्ट केले. सहाय्यक मुख्यालय सी एस सवर्णकर, परिरक्षण भूमापक एस एन नलावडे, यांनी उपोषणकर्त्यांना कारवाईचे पत्र व नारळ पाणी देऊन उपोषणाची सांगता केली यावेळी आर पी आय (खरात) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, यांनी मोलाचे सहकार्य केले तर कास्टट्रइब कर्मचारी संघटनेचे राज्य अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे,लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजभाऊ गायकवाड,यांनी पाठिंबा देऊन उपस्थिती दर्शवली तर या आमरण उपोषणास येथील महिला,पुरुष व लहान मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते






