धाराशिव (दि. २९ ऑगस्ट) –
पत्रकार बांधव हे समाजाचे चौथे स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले लोकशाहीसाठी गंभीर धोक्याची घंटा आहेत. धाराशिव लाईव्हचे संपादक श्री. सुनिल ढेपे यांच्यावर तुळजापूर पोलीस स्टेशनने केलेली कारवाई ही पत्रकारितेचे गळचेपी करण्याचा उघड प्रयत्न असून त्यामागे पोलीस प्रशासनाचा मनमानी कारभार उघडकीस येतो, असा तीव्र संताप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) यांनी व्यक्त केला आहे.
आज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या निवेदनात पत्रकार सुनिल ढेपे यांच्यावरील अन्यायकारक कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच, पत्रकार बांधवांना जिल्हा व तालुका स्तरावर काम करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, यामध्ये प्रेस कॉन्फरन्स हॉल, बसण्याची व्यवस्था, वीज, इंटरनेट, पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असा आग्रह धरला आहे.
पक्षाच्या प्रमुख मागण्या :
1. पत्रकार सुनिल ढेपे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई तातडीने मागे घ्यावी.
2. तुळजापूर पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.
3. जिल्हा व तालुका स्तरावरील पत्रकार बांधवांना योग्य सुरक्षा देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.
4. पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र व सुसज्ज पत्रकार कक्ष त्वरित सुरू करावा.
या मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) ने दिला आहे.
या वेळी निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत,बापूराव गायकवाड,नेताजी लोंढे,अविनाश नन्नवरे,रामहरी गायकवाड यांच्या सह्या आहेत






