दिनांक.01/10/2025
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव शहरातून जाणारा पाटस-दौंड-बार्शी-बोरफळ राज्य मार्ग क्रमांक 68 हा जिल्ह्यातील महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेले रुंदीकरण शासन आदेश व मंजूर विकास आराखड्याच्या विरुद्ध होत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) यांनी केला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
राऊत यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, नगरपरिषद धाराशिवच्या विकास आराखड्यानुसार या रस्त्याची रुंदी 30 मीटर (दोन्ही बाजूंस 15-15 मीटर) इतकी निश्चित आहे. शासन अधिसूचना क्र. TPS-3409/1256/CR-299/UD-30, दि. 04 एप्रिल 2012 अन्वयेही हीच अट आहे. मात्र प्रत्यक्षात फक्त 24 मीटर (12-12 मीटर) इतकेच रुंदीकरण सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, “हा प्रकार शासन आदेशाचा भंग असून बेकायदेशीर आहे. शिवजयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सारख्या मोठ्या कार्यक्रमांदरम्यान लाखो लोक या मार्गावर जमा होतात. अशा वेळी 24 मीटरचा रस्ता अपुरा पडणार असून वाहतूककोंडी, गोंधळ आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे 30 मीटर रुंदीकरणच अपरिहार्य आहे.”
मागण्या
1. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानचा रस्ता शासन आदेशाप्रमाणे 30 मीटर रुंदीनेच करावा.
2. शासन आदेश मोडून काम करणाऱ्या उपविभागीय अभियंता श्री. मोरे यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी लावावी.
3. चुकीच्या पद्धतीने सुरू केलेले काम थांबवून ते शासन आदेशानुसारच सुरू करावे.
इशारा
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (खरात)दिला आहे. यानंतर उद्भवणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.






