अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची मागणी, शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी*
धाराशिव प्रतिनिधी दि.03/10/2028
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर भर दिला. धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खरात यांनी सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी केली.
खरात म्हणाले की, “मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरं, शेतजमिनी, पिकं व जनावरे वाहून गेली आहेत. अनेकांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यूही झाला आहे. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नसून सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे.”
त्यांनी पुढील ठोस मागण्या मांडल्या :
शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत द्यावी.
पीडितांना मोफत अन्नधान्य व पुनर्वसन करावे.
भूमिहीन शेतमजुरांना दरमहा १० हजार रुपये तीन वर्षांसाठी द्यावेत.
यासोबतच खरात यांनी अनुसूचित जाती (एसी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जोरदार विरोध दर्शवला. ते म्हणाले की, “एसी आरक्षणाचे तुकडे करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत आम्ही सहन करणार नाही. ओबीसींचे आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे आणि जर एसी आरक्षणाचे विभाजन करण्याचा हट्ट सरकारने धरला, तर आर.पी.आय. (खरात गट) रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.”
खरात पुढे म्हणाले की, “जर सरकारने शेतकरी व शेतमजुरांना तात्काळ व पुरेशी मदत केली नाही, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राज्यव्यापी आंदोलन उभारेल.”
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांनी थेट टीका केली. खरात म्हणाले की, “धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकुर गावातील एका शेतकऱ्याला मदत करणे स्वागतार्ह आहे. मात्र, त्या मदतीसाठी स्वतःचा फोटो छापून प्रसिद्धी करण्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्याला खरी मदत केली की केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवली, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शिंदे साहेबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्वप्रथम राजीनामा द्यावा.”
या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष महावीर गायकवाड, राजाभाऊ गायकवाड, सुशील वाघमारे, निवृत्ती हौसलमल, बाबासाहेब ओव्हाळ, रामकृष्ण वाघमारे, अण्णाराव जाधव, शहाजी ढेरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






