धाराशिव:- सर्वोच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती मा. बी.आर.गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा धाराशिव जिल्ह्यातील विविध सामाजिक, कर्मचारी आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून भारताचे राष्ट्रपती महोदयांना संबोधित निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा राकेश किशोर या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.
तसेच संबंधित आरोपीची वकिली सनद रद्द करण्यात यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर कस्टट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अतिरिक्त महासचिव हरिभाऊ बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विजयकुमार गायकवाड, ॲड अजित कांबळे, ॲड के. टी. गायकवाड, ॲड महेंद्र सोनवणे,ॲड दिलीप कांबळे, ॲड अनुरथ नागटिळक, ॲड आदेश पांडागळे, प्रा.डी.डी. मस्के, प्रा.डॉ. दिनकर झेंडे, तसेच आर पी आय (खरात गट) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाव असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
> “मा. न्यायमूर्ती बी. आर. गवई हे भारताच्या न्यायव्यवस्थेतील प्रामाणिक, निष्पक्ष आणि संवेदनशील न्यायाधीश आहेत. त्यांच्या विरोधात झालेला हल्ल्याचा प्रयत्न हा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानिक मूल्यांवर थेट प्रहार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत,”
असा एकमुखी आग्रह उपस्थितांनी धरला.
या निवेदनाद्वारे उपस्थित सर्व संघटना आणि नागरिकांनी “न्यायमूर्तींचे संरक्षण म्हणजे न्यायसंस्थेचे संरक्षण” असा ठाम संदेश दिला आहे.






