spot_img
spot_img
spot_img

नळदुर्ग निवडणूक : १८९ उमेदवार रिंगणात, नगराध्यक्षपदासाठी १६ उमेदवारांची धावपळ

प्रतिनिधी | नळदुर्ग

नळदुर्ग नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणशिंग वाजले असून, अंतिम दिवसापर्यंत एकूण १८९ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात १६ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर १७३ उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत.

१७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशीच तब्बल १११ उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड आणि रामकृष्ण जाधवर यांच्या समोर आपले अर्ज सादर केले. यावेळी नगरपालिकेच्या आवारात अभूतपूर्व गर्दी झाली होती.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे अशोक जगदाळे, भाजपचे बसवराज धरणे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे संजय बताले, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे महेबूब शेख, एआयएमआयएमचे शहेबाज काजी आणि अपक्ष मुजम्मिल शेख यांच्यासह एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिंदे गट वगळता महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार उतरवल्याने नगराध्यक्षपदासाठी तीव्र आणि चुरशीची लढत होणार आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांत उत्सुकता वाढली असून, आगामी काही दिवसांत प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या