अणदूर | प्रतिनिधी.सहायक प्रभारी कृषी अधिकारी सौ. प्रियंका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अणदूर येथे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहितीपर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शेतीसाठी डिजिटल साधनांचा उपयोग कसा करावा याबाबत या सत्रात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि समजण्यास सोपी अशी माहिती देण्यात आली.
या सत्रात ‘महाविस्तार’ या कृषीविषयक ॲपची सविस्तर माहिती देत पवार मॅडम यांनी ॲपमधील विविध सोयींचे प्रात्यक्षिक सादर केले. महाविस्तार ॲपद्वारे उपलब्ध असलेल्या खालील प्रमुख सेवांवर त्यांनी विशेष भर दिला—
पीक लागवड, खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रणाविषयी अद्ययावत शिफारसी
हवामान अलर्ट व पर्जन्यमानाचा अचूक अंदाज
शेतकरी प्रशिक्षण, शासकीय योजना व अनुदानांची माहिती
तज्ज्ञ कृषी अधिकाऱ्यांशी थेट संपर्क सुविधा
सत्रादरम्यान मोबाईलवर ॲप कसे डाउनलोड करायचे, नोंदणी कशी करायची आणि विविध मेन्यूचा वापर कसा करायचा याचे डेमो सादर करण्यात आले. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढविणे शक्य असल्याचे पवार मॅडम यांनी स्पष्ट केले.








