नळदुर्ग | प्रतिनिधी
ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी वेळा-अमावस्या सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सतर्कतेचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. वार शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या या पारंपरिक सणानिमित्त अनेक नागरिक शेताकडे वनभोजन व सण साजरा करण्यासाठी जात असतात. या कालावधीत गावात व परिसरात घरफोडी व चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, सणाच्या निमित्ताने अनेक घरे बंद असण्याचा फायदा घेत चोरट्यांकडून चोरीचे प्रयत्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खालील सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेताकडे जाताना घरात किमान एक व्यक्ती उपस्थित असावी.
घरातील दारे व खिडक्या व्यवस्थित कुलूपबंद करूनच बाहेर पडावे.
घरातील मौल्यवान दागिने, रोकड व महत्त्वाच्या वस्तू शक्यतो स्वतःसोबत ठेवाव्यात.
परिसरात संशयित व्यक्ती (चेहऱ्याला कापड बांधलेले) किंवा संशयास्पद वाहने (नंबर प्लेट नसलेली किंवा परजिल्ह्यातील) दिसल्यास तात्काळ चौकशी करावी.
कुठल्याही हालचालीवर संशय आल्यास त्वरित पोलीस पाटील, बीट अंमलदार किंवा डायल 112 वर संपर्क साधावा.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन चंद्रकांत यादव यांनी नागरिकांना सण आनंदात आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्याचे आवाहन करत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मो. नं. 9049234303 वर संपर्क साधण्याचे सांगितले आहे.
पोलीस प्रशासनाच्या या सूचनांचे पालन करून नागरिकांनी वेळा-अमावस्या सण सुरक्षितपणे साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






