spot_img
spot_img
spot_img

अनुष्का पाठोळे मृत्यू प्रकरणी SIT चौकशीची ठाम मागणी

तुळजापूर (प्रतिनिधी) | लातूर जिल्हा, लातूर तालुका :

तुळजापूर तालुक्यातील मौजे जवाहर नवोदय विद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या मातंग समाजातील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. अनुष्का पाठोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची SIT (विशेष तपास पथक) मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी लहुजी शक्ती सेना, तुळजापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन नळदुर्ग पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षकांना सादर करण्यात आले. निवेदनात घटनेच्या सर्व बाजूंनी निष्पक्ष, पारदर्शक व वेळबद्ध तपास व्हावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी ठोस भूमिका मांडण्यात आली आहे.

यावेळी लहुजी शक्ती सेना, धाराशिव जिल्हा अध्यक्ष शिवाजी भाऊ गायकवाड, तालुका अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजबांधवांनी या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता उच्चस्तरीय तपास जाहीर करण्याची मागणी लावून धरली.

प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन SIT चौकशी जाहीर करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.

— आवाज महाराष्ट्र न्यूज

Related Articles

ताज्या बातम्या