तुळजापूर (प्रतिनिधी):
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील शहापूर गटात अपक्ष उमेदवार शिवाजी कांबळे यांनी मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शाहू–फुले–आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते देवानंद भाऊ रोजकरी यांचा ठाम पाठिंबा आणि गावोगावी सक्रिय असलेले देवराज मित्रमंडळ यामुळे कांबळे यांच्या उमेदवारीला भक्कम बळ मिळत आहे.
शहापूर गटातील “गाव तेथे देवराज मित्रमंडळ शाखा” हे चित्र सध्या दिसून येत असून, मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर सक्रियपणे प्रचारात उतरले आहेत. संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध प्रचार आणि थेट जनतेशी संवाद यामुळे कांबळे यांची लढत दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे दिसत आहे.
वीरशैव शिवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष, देवराज युवा मंचचे जिल्हाध्यक्ष, आयडियल पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे जिल्हा संघटक अशी मजबूत सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेले शिवाजी कांबळे यांना तीस वर्षांचा अनुभव आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आपली ताकद वेळोवेळी सिद्ध केली आहे.
सध्या मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे की, लिंगायत समाजाचे मोठ्या प्रमाणावर मतदान शिवाजी कांबळे यांच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे. समाजातील विविध घटकांशी असलेली त्यांची जवळीक, सामाजिक कामांचा प्रदीर्घ अनुभव आणि संघटनांची मजबूत साथ यामुळे हे मतदान निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
“पक्ष नव्हे, प्रश्न महत्त्वाचा” ही भूमिका घेत अपक्ष म्हणून लढणारे शिवाजी कांबळे हे शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी थेट मैदानात उतरले आहेत. त्यामुळेच सर्व जाती-धर्मातील मतदार त्यांच्याकडे एक सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून पाहत आहेत.
देवराज मित्रमंडळाचे गावोगावी असलेले जाळे, कार्यकर्त्यांची ताकद, देवानंद भाऊ रोजकरी यांचा ठाम पाठिंबा आणि वाढता जनसमर्थन पाहता, “ही लढत केवळ सहभागासाठी नसून विजय खेचून आणण्यासाठीच आहे,” अशी चर्चा सध्या शहापूर गटात जोर धरत आहे.






