जिल्हा प्रतिनिधी (शाम नागिले) : तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय निष्ठावंत कार्यकर्ते अमोल राजकुमार पाटील हे नंदगाव जिल्हा परिषद गटातून तर येडोळा ता. तुळजापूर येथील माजी सरपंच पद्माकर मधुकर पाटील हे खुदावाडी पंचायत समिती गणातून सदस्यत्वाची निवडणूक लढवत असून आपल्या प्रचाराचा शुभारंभ त्यांनी वागदरी येथे पारंपारिक पानसुपारीच्या कार्यक्रमाने केला.
या बाबत सविस्तर असे की,तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून एकूण चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर पंचायत समिती खुदावाडी गणातून एकूण आठ उमेदवार व नंदगाव गणातून चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हावर नंदगाव जिल्हा परिषद गटातून वागदरी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर खुदावाडी पंचायत समिती गणातून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर येडोळा येथील माजी सरपंच पद्माकर मधुकर पाटील हे निवडणूक लढवीत आहेत.त्यांनी कसल्याही प्रकारचा देखावा न करता आपल्या प्रचाराचा शुभारंभ वागदरी तालुका तुळजापूर येथे अमोल पाटील यांच्या घरी पान सुपारी चा कार्यक्रम घेऊन केला, या पारंपारिक पद्धतीने पान सुपारीच्या कार्यक्रमाने आपल्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी गावातील सर्व ग्रामस्थांना निमंत्रित केले होते.यावेळी बोलताना अमोल पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्या शासकीय पातळीवरून सोडविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी अत्यंत निरपेक्ष भावनेतून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून माझी निवडणूक ही केवळ आणि केवळ जनतेच्या सेवेसाठी आहे. तेंव्हा आपली सेवा करण्याची संधी मला द्यावी असे कळकळीची अवाहन त्यांनी यावेळी उपस्थितताना केले. याप्रसंगी पद्माकर पाटील यांनी ही आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी वागदरी व येडोळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी पानसुपारी करून आपल्या प्रचाराच्या शुभारंभ केल्याचे सर्वांनी शुभेच्छा दिल्या.






