नंदगाव येथे जेसीबीमधून जंगी मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी
नंदगाव (प्रतिनिधी – शाम नागिले):
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धेश्वर बाजीराव कोरे (सिद्धू अण्णा) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह नंदगाव गटात पुन्हा एकदा विकासाचे कमळ फुलले असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार राणाजगजीतसिंह पाटील उर्फ राणा दादा यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती. नंदगाव जिल्हा परिषद गटातून सिद्धेश्वर कोरे, तर पंचायत समिती नंदगाव गणातून भाजपाच्या सौ. रोहिणी विवेकानंद मिलगेरी आणि खुदावाडी गणातून भिवाजी इंगुले यांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी निकाल जाहीर झाला असून नंदगाव जिल्हा परिषद गटासह दोन्ही गणांत भाजपाचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात नंदगाव गावात जेसीबीमधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषात संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.
विजयी उमेदवार सिद्धू अण्णा कोरे यांचा व विजयाचे मानकरी कार्यकर्त्यांचा सत्कार नंदगाव गावचे सरपंच शशिकांत नागिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा विजय म्हणजे विकासाच्या कामांवर जनतेने टाकलेली मोहोर असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






