नळदुर्ग (प्रतिनिधी) – शहरातील विकास आराखड्यात (D.P. प्लॅन) आरक्षित ठेवलेल्या जागांवर अद्याप प्रत्यक्ष कामे सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज, नळदुर्ग यांच्या वतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नळदुर्ग नगरपालिका व नगररचना विभागाने शहरातील विविध ठिकाणी विकास आराखड्यानुसार जागा आरक्षित केल्या आहेत. यामध्ये –
भाजी मंडई
सरकारी गावठाण बगीचा (सर्वे क्र. 29)
शासकीय विश्रामगृह वाढीव क्षेत्र (सर्वे क्र. 296/380)
इतर विविध राखीव जागा
या ठिकाणांसाठी आरक्षण ठेवून संबंधित कामांसाठी निधीही मंजूर झाल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू न झाल्यामुळे शहर विकासाचा वेग मंदावला असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सकल हिंदू समाजाने आपल्या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे की, आरक्षणानुसार मंजूर निधीचा तात्काळ वापर करून संबंधित विकासकामे त्वरीत सुरू करण्यात यावीत. अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र होऊ शकतात, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत माहितीस्तव तुळजापूर तहसील कार्यालय, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष यांना देण्यात आली आहे.
शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आरक्षित जागांवरील प्रलंबित कामे तातडीने सुरू होतील का, याकडे नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे.






