धाराशिव प्रतिनिधी दि.२ एप्रिल महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सन २०२० पासून बांधकाम कामगार नोंदणी,नुतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत.हे सर्व अर्ज अधिकृत संकेतस्थळ www.mahabocw.in वर सादर करता येतात.
नोंदणीसाठी १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगार पात्र असून,मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे.अर्ज सादर करताना अधिकृत ओळखपत्र,रहिवासी पुरावा आणि कार्यरत असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.तसेच,अर्ज सादर केल्यानंतर कामगारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पडताळणी प्रक्रियेत भाग घेणे गरजेचे आहे.
ऑनलाईन प्रणालीमध्ये ओटीपी पडताळणी,बायोमेट्रिक सत्यापन आणि थेट बँक खात्यात लाभ जमा करण्यासारख्या प्रक्रियांमुळे कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला वाव नाही.त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या निधीतून पैसे घेतले जात असल्याचा आरोप निराधार आहे.याशिवाय, कोणीही आर्थिक मागणी करत असल्यास, तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.