टाळ – मृदंगाचा गजर व गुलाब पुष्प फुलांची उधळण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले
नळदुर्ग दादासाहेब बनसोडे
आषाढी एकादशी निमित्त दि. ०६ जुलै रोजी नळदुर्ग येथील मराठा गल्ली येथील भजनी मंडळाच्या वतीने नळदुर्ग शहरातुन भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीमुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
दि. ६ जुलै रोजी संपुर्ण राज्यात आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नळदुर्ग शहरातही आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मराठा गल्ली येथील भजनी मंडळाच्या वतीने शहरातुन भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. सकाळी ८ वा. मराठा गल्ली येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरातुन माऊलीची पालखीतुन टाळ – मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. ही मिरवणुक मराठा गल्ली येथुन निघाल्यानंतर पांचपीर चौक, भोई गल्ली, क्रांती चौक, चावडी चौक, महात्मा बसवेश्वर महाराज चौक, भवानी चौक,राम मंदिर, सावरकर चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गे दुपारी १२ वा. मराठा गल्ली येथील विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.
मिरवणुक निघाल्यानंतर मिरवणुक मार्गावरील प्रत्येक चौकात मिरवणुकीचे स्वागत करून माऊलीचे दर्शन घेण्यासाठी नागरीकांनी विशेष करून महिलांनी मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रांगोळी काढुन व पालखीवर फुले उधळुन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. टाळ – मृदंगाचा गजर व बहारदार भजन तसेच मिरवणुकीतील सहभागी झालेल्या महिला, पुरुष, युवक लहान मुलींनी टाळ – मृदंगाच्या तालावर फुगडी खेळुण आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिस कर्मचारी व होमगार्ड महिला कर्मचाऱ्यांनीही फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.पालखी मिरवणुक सावरकर चौकात आल्यानंतर माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी त्यांनी पालखीचे भव्य स्वागत करून मिरवणुकीतील नागरीकांना केळी व शाबु चिवड्याचे वाटप केले.
या मिरवणुकीत भजनी मंडळाचे मोहीत कलकोटे, खाटमोडे, तानाजी जाधव गुरुजी, मिलिंद भुमकर, बलभीमराव मुळे, सुभद्राताई मुळे,विमलबाई काळे,महेश जाधव, संजय बेले, मोहन डोंगरे, सुहास येडगे, तानाजी जाधव, तानाजी मुळे,कुरुक्षेत्र किल्लेदार, विलास येडगे, सुधीर हजारे, संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकुर,अन्ना जाधव, तुकाराम जाधव,धनाजी जाधव, दीपक काशिद, डॉ. दीपक जगदाळे,अमर भाळे, सुधीर हजारे, अमोल सुरवसे, बालाजी ठाकुर, शिवाजी सुरवसे, तानाजी सुरवसे, प्रशांत पवार यांच्यासह शिवशाही तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भजनी मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुक सोहळ्यानंतर सर्व भाविकांना मराठा गल्ली येथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.