धाराशिव, २३ जुलै :
कळंब पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवी सानप यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली, मटका, गांजा व अन्य अवैध धंद्यांना पाठबळ देणे, तसेच महिलांशी गैरवर्तन यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृह मंत्रालयाकडे सविस्तर तक्रार निवेदन दिले होते.
या निवेदनात सानप यांच्यावर नशेखोरांना संरक्षण देणे, दरमहा खंडणी वसूल करणे, असंसदीय आणि अश्लील भाषा वापरणे, पोलीस खात्याच्या प्रतिमेला मलीन करणे आणि जनतेत भीती निर्माण करणारे वर्तन केल्याचे ठळक आरोप करण्यात आले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस मुख्यालय धाराशिव मार्फत तात्काळ कारवाई करत रवी सानप यांची कळंब येथून मुख्यालयाच्या ठिकाणी उचलबांगडी करण्यात आली आहे.
त्यानंतर त्यांच्या जागी एक प्रामाणिक, निष्पक्ष व कार्यक्षम अधिकारी म्हणून अजित चिंतले यांची कळंब पोलीस ठाण्याचे नवीन निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचे शहरवासीयांसह विविध सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.
राजाभाऊ राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सत्यासाठी लढण्याचा आणि लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा हा विजय आहे. पोलीस खात्यातील अपप्रवृत्तीला वाचा फोडल्याशिवाय समाज सुरक्षित राहू शकत नाही. शासनाने योग्य निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि प्रशासनाचे मन:पूर्वक आभार मानतो.”
या निर्णयामुळे कळंब परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागेल, तसेच पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






