नंदगाव (शाम नागिले) धाराशीव जिल्हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो यात मागील काही दिवसा पासून ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली असून, अनेक घरांचे, रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
या बाबत सविस्तर असे की कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली असून, अनेक घरांचेही नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत. काही पुलावरून पाणी गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नंदगाव व परिसरात शुक्रवार शनिवार व रविवार रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे लोहगाव,नंदगाव व हंगरगा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता काही काळ बंद करण्यात आला होता.
रात्रभर पावसामुळे नंदगाव व परिसरातील रस्त्यावर पाणी वाहू लागले. या भागातील खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांत पाणी साचून काढणीस आलेल्या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. नंदगाव ते अक्कलकोट, नंदगाव ते जळकोट व नंदगाव ते नळदुर्ग हा रास्ता सातत्याने वर्दळीचा असल्याने व मुसळधार पावसामुळे सुमारे 10 ते12 गावांचा संपर्क तुटला. याबरोबरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे.हंगरगा गावाजवळील पूल हा धोकादायक होत असून तो उंच व नवीन बनविण्यात यावा अशी मागणी गावकर्यातून होत आहे.






