spot_img
spot_img
spot_img

फुलवाडी टोलनाका वसुलीविरोधात सोमवारी ‘जन-आक्रोश आंदोलन’; पवन घुगरे यांचा हुकूमशाही टोलविरोधात एल्गार

*अणदूर प्रतिनिधी* .दि. १९

सोलापूर–उमरगा राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी टोलनाका येथे अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे असूनही अन्याय्य टोल वसुली सुरू असल्याचा आरोप करत, या टोल नाक्याविरोधात सोमवारी (दि. २० ऑक्टोबर) मोठे “जन-आक्रोश आंदोलन” छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते पवन कुमार घुगरे करणार असून, चक्काजाम आंदोलन व टोल वसुली बंद करण्याची हाक देण्यात आली आहे.

घुगरे यांनी सांगितले की, “गेल्या १४ वर्षांपासून फुलवाडी टोलनाका हा जनतेच्या लुटीचे प्रतीक बनला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट, अपूर्ण आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे आहे. प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त आहेत, पण टोल वसुली मात्र जोरात चालू आहे. हे प्रशासनाचे आणि संबंधित कंत्राटदारांचे संगनमत आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

गेल्या काही वर्षांत या टोलविरोधात अनेकदा आंदोलन, रस्ता रोको, टोलबंदी करण्यात आली, परंतु काही दिवसांनी पुन्हा तीच स्थिती निर्माण होते. त्यामुळे यावेळी हे आंदोलन निर्णायक करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, अणदूर आणि जळकोट परिसरात अर्धवट रस्त्याच्या कामांमुळे अनेक घरांत पाणी शिरले, घरे कोसळली, तर शेतीजमिनी पाण्याखाली गेल्या, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही संबंधित रस्ते व वाहतूक विभागाचे अधिकारी मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याने नागरिकांचा संताप अधिक वाढला आहे.

“फुलवाडी टोलनाका हा भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि अन्यायाचे प्रतीक बनला आहे. जनतेचा पैसा, जीव आणि वेळ तिन्ही गोष्टींवर आघात होतो आहे. यावेळी आंदोलन थांबणार नाही, तोपर्यंत जोपर्यंत टोलवसुली पूर्णपणे थांबत नाही,” असा इशारा घुगरे यांनी दिला.

या आंदोलनाबाबत परिसरात मोठी चर्चा असून, प्रशासनासमोर उद्या जनतेचा संताप उसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या