नळदुर्ग – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय अस्मितांचे रंग चढू लागले असून काँग्रेस पक्षाने आपल्या ताकदीचा ठसा उमटवत नळदुर्ग नगराध्यक्ष पदासाठी अशोक भाऊ जगदाळे यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. शहरातील विकास आणि जनतेच्या प्रश्नांना अग्रक्रम देण्याच्या निर्धारासह जगदाळे यांनी निवडणूक लढवण्याचा संकल्प दर्शवला आहे.
जगदाळे म्हणाले, “नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचा विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद मिळणे हे माझ्या कार्याचे बळ आहे.” त्यांनी स्वच्छ प्रशासन, पायाभूत सुविधा विकास आणि जनकल्याणावर आधारित आराखडा सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.
या उमेदवारीअर्ज दाखल कार्यक्रमाला काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, माजी जनप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या हालचालीमुळे नळदुर्गमध्ये काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला नवी उभारी मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे..






