सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर अणदूर (ता. तुळजापूर) येथील चिवरी पाटी जवळ आज (२२ नोव्हेंबर) सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर सात ते आठ प्रवासी गंभीर- किरकोळ जखमी झाले. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुझर (MH 24 V 4948) या वाहनाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून बाजूला पलटी झाली. वाहनातील सर्व प्रवासी सोलापूर जिल्ह्यातील उळे येथील असल्याचे प्रारंभी समजते.
अपघातात मृत्यू झालेल्या महिलांमध्ये साक्षी बडे, सोनाली कदम आणि पूजा शिंदे यांचा समावेश आहे.
तर आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम आणि कार्तिक आमराळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी वाहनाचा वेग अनियंत्रित झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे अणदूर परिसरात शोककळा पसरली आहे.






