नळदुर्ग | दि. 18 डिसेंबर 2025
नांदेड येथील सलमान शेख या इसमाकडून सामाजिक कार्यकर्त्या हर्षुताई ठाकूर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची व बदनामी करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सकल हिंदू समाज, नळदुर्ग यांच्या वतीने आज नळदुर्ग पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले.
हर्षुताई ठाकूर या गोरक्षण, महिलांवरील अन्याय, तसेच फसवणूक व मानसिक शोषणाविरोधात जनजागृतीचे काम करत असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे संबंधित इसमाकडून मागील काही दिवसांपासून मोबाईल व सोशल मीडियाद्वारे वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या धमक्यांमुळे हर्षुताई ठाकूर मानसिक तणावाखाली असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. महिलेला उद्देशून धमकी देणे, मानसिक छळ करणे व सामाजिक कार्य थांबवण्यासाठी दबाव टाकणे हा गंभीर गुन्हा असल्याने संबंधित इसमाविरुद्ध भारतीय दंड संहितेतील लागू कलमान्वये तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे.
तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित इसमावर राहील, अशी नोंद प्रशासनाने घ्यावी व हर्षुताई ठाकूर यांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून पोलीस प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.






