धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट हा महाविकास आघाडीसोबत एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार निंबाळकर म्हणाले की, महाविकास आघाडी ही लोकांच्या प्रश्नांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने लढणारी आघाडी आहे. धाराशिव जिल्ह्यात आघाडीच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व उभे करून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समित्या या ग्रामीण विकासाचा कणा आहेत. त्यामुळे या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट हा महाविकास आघाडीच्या सहकार्याने ताकदीने मैदानात उतरणार आहे.
या विधानामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून, आगामी निवडणुकांत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आगामी काळात जागावाटप, उमेदवारांची निवड तसेच प्रचाराची दिशा याबाबत आघाडी पातळीवर सविस्तर चर्चा होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.






