अणदूर (प्रतिनिधी):
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अणदूर गटातील राजकीय वातावरण तापू लागले असून आज एडवोकेट दीपक दादा आलूरे यांनी जिल्हा परिषद अणदूर गटातून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. त्यांच्या उमेदवारीमुळे अणदूर गटातील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सामाजिक, कायदेशीर आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून ॲड. आलूरे यांची ओळख आहे. “विकास, न्याय आणि पारदर्शक प्रशासन” या ठोस मुद्द्यांवर त्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, त्यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना समर्थकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी बोलताना ॲड. आलूरे म्हणाले की, अणदूर गटाचा सर्वांगीण विकास, सामान्य नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेचा आवाज बुलंद करणे हेच माझे ध्येय आहे.
ॲड. दीपक दादा आलूरे यांच्या प्रवेशामुळे अणदूर गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, येणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






