spot_img
spot_img
spot_img

जिल्हा परिषद सांजा गट २४ मधून राजाभाऊ राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील सांजा जिल्हा परिषद गट क्रमांक २४ (अनुसूचित जातीसाठी राखीव) येथून आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू व लढवय्ये नेते राजाभाऊ राऊत यांनी दि. २१/०१/२०२६ रोजी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, धाराशिव यांच्याकडे अपक्ष उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजाभाऊ राऊत सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांनी आंबेडकरी चळवळीला बळकटी देणे, बौद्ध समाजासह वंचित-शोषित घटकांना न्याय मिळवून देणे, तसेच संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे यासाठी सातत्याने काम केले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व त्यांच्या मित्रपक्षांकडून सांजा गटातून उमेदवारी देण्याचे आश्वासन मिळाले होते; मात्र ऐनवेळी कोणतेही ठोस कारण न देता उमेदवारी नाकारण्यात आली. विशेष म्हणजे, या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाची लोकसंख्या असूनही बौद्ध समाजातील कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी न देता त्यांचा सामाजिक आणि राजकीय बहिष्कार केला गेला. राजाभाऊ राऊत यांचे म्हणणे आहे की हा निर्णय आंबेडकरी विचारधारेवर व बौद्ध समाजाच्या हक्कांवर झालेला अन्याय आहे.

राजाभाऊ राऊत गेल्या २० वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय असून फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठेने चालणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता, मानवाधिकार व संविधानिक हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांनी ठामपणे सांगितले:

“फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांची ताकद काय आहे, हे या निवडणुकीच्या माध्यमातून जातीयवादी पक्षांना आणि सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ.”

राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारीचा मुख्य उद्देश जिल्हा परिषदेमधून वंचित, शोषित, दलित, बौद्ध तसेच सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करणे, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन उभे करणे आहे. सांजा गट व परिसराशी त्यांचा दीर्घकाळचा थेट संबंध असल्यामुळे येथील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाशी संबंधित मूलभूत प्रश्नांची त्यांना सखोल माहिती आहे. या समस्यांसाठी कोणतीही तडजोड न करता संघर्ष केला जाईल, असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

दरम्यान, बौद्ध समाजाची मोठी लोकसंख्या असूनही त्या समाजाला उमेदवारी न देण्याच्या भूमिकेमुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. राजाभाऊ राऊत यांचा ठाम विश्वास आहे की हा अन्यायकारक निर्णय संबंधित जातीयवादी पक्षांना फटका देईल आणि बौद्ध मतदार लोकशाही मार्गाने योग्य तो निर्णय घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवतील.

यावेळी राऊत यांनी म्हटले आहे की,या निवडणुकीसाठी सर्व आंबेडकरवादी पक्षांचा पाठिंबा घेण्याचा निर्धार केला आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या