अणदूर (प्रतिनिधी): अणदूर पंचायत समिती गणात यावेळी राजकीय चित्र पूर्णपणे बदलले असून भारतीय जनता पक्षाने या गणावर ठोस पकड मिळवली आहे. भाजपकडून उमेदवार असलेले रणवीर सुनील चव्हाण यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आता केवळ शक्यता न राहता जवळपास निश्चिततेकडे झुकताना दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल होताच विरोधकांची धावपळ सुरू झाली आणि प्रत्यक्ष लढत देण्याची ताकदच कुणाकडे उरलेली नाही, असेच चित्र सध्या या गणात आहे.
स्थानिक राजकारणात मजबूत संघटन, कार्यकर्त्यांची लोखंडी एकजूट आणि रणवीर चव्हाण यांचा जनतेत असलेला ठाम विश्वास या तीनही गोष्टींनी मिळून अणदूर गणात भाजपचा दबदबा स्पष्ट केला आहे. निवडणूक रणांगणात उतरण्याआधीच अनेकांनी माघार घेतली असून, काही इच्छुकांनी शांतपणे “रिंगणाबाहेर” राहणेच पसंत केल्याची चर्चा जोरात आहे.
रणवीर सुनील चव्हाण हे नाव आज केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर अणदूरच्या विकासाचा ठोस चेहरा म्हणून ओळखले जाते. गावागावातील प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न आणि मूलभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच या गणात ‘निवडणूक लढवायची की नाही’ हा प्रश्न विरोधकांसमोर उभा राहिला असून, प्रत्यक्ष सामना करण्याची हिंमत कुणीही दाखवताना दिसत नाही.
विशेष बाब म्हणजे, अणदूर पंचायत समिती गणात विरोधकांकडून ठोस, विश्वासार्ह आणि जनाधार असलेला उमेदवार न उभा राहणे हेच रणवीर चव्हाण यांच्या ताकदीचे मोठे प्रमाण मानले जात आहे. भाजपचा वाढता प्रभाव, लोकांमधील विश्वास आणि नेतृत्वावरची पकड यामुळे या गणात एकतर्फी वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ही संभाव्य बिनविरोध निवड म्हणजे अणदूर गणातील जनतेने आधीच कौल दिल्याचा स्पष्ट संदेश आहे. निवडणूक न होता विजय मिळणे ही कुणाची कृपा नसून, ती जनविश्वासाची पावती आहे, असे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
अद्याप अधिकृत घोषणा बाकी असली तरी, सध्याची परिस्थिती पाहता रणवीर सुनील चव्हाण पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. या बिनविरोध निवडीमुळे अणदूर पंचायत समितीत भाजपचा आवाज अधिक बुलंद होणार असून, जिल्हा राजकारणातही त्याचे पडसाद उमटणार हे नक्की.






