बॅनर फाडण्यासह सभेला आलेल्या नागरिकांच्या वाहनांची तोडफोड –
अणदूर (प्रतिनिधी) –
निवडणूक ही लोकशाहीची पर्वणी असते. मात्र अणदूर जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या काही घटनांनी हीच लोकशाही प्रश्नांकित केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रचार बॅनर फाडण्यात आले, तसेच प्रचार सभेसाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या वाहनांच्या काचा फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे अणदूरच्या शांत, सुसंस्कृत प्रतिमेला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काल झालेल्या प्रचार सभेनंतर काही अज्ञात समाजकंटकांनी जाणीवपूर्वक बॅनर फाडून प्रचार साहित्याचे नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता, सभेला उपस्थित राहिलेल्या नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ज्या अणदूर गावावर स्वर्गीय शिक्षणमहर्षी सि. ना. आलूरे गुरुजी आणि सहकार महर्षी मधुकरराव चव्हाण साहेब यांचे संस्कार आहेत, त्या गावात अशा प्रकारच्या हिंसक आणि भ्याड कृत्यांची कुणालाही अपेक्षा नव्हती. मतभेद असू शकतात, पण मतांच्या लढाईत दहशत, हिंसा आणि तोडफोड यांना कोणतेही स्थान नाही, हे राजकारणातील प्रत्येक घटकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
या घटनांचा महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. आम्ही कधीही वैयक्तिक टीका केली नाही आणि करणारही नाही; मात्र अशा जाणून-बुजून घडवलेल्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अणदूर गटातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही प्रकारच्या दहशतीला बळी न पडता, विचलित न होता विवेकबुद्धीने मतदान करावे. निवडणुका येतात-जातात, विजय-पराजय होत राहतो; पण अशा कृत्यांमुळे आपल्या गावाची प्रतिमा मलीन होऊ नये, याची जबाबदारी प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे.
लोकशाहीला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखले नाही, तर उद्याचा काळ अधिक भयावह ठरू शकतो, अशी चिंता नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






