धाराशिव : महाराष्ट्रातील कुस्तीविश्वात अत्यंत मानाची समजली जाणारी ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा सासवड येथे रंगणार असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील उदयोन्मुख पैलवान राहुल मुळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेल्या राहुल मुळे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जिल्हा व तालुका स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैदानावरची त्यांची आक्रमक शैली, ताकद आणि चपळाई यामुळे ते प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच आव्हान ठरले आहेत.
सासवड येथे होणाऱ्या या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राज्यभरातील नामांकित पैलवान सहभागी होणार असून, त्या ताकदीच्या स्पर्धेत राहुल मुळे हे धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला नवे बळ मिळाले असून, कुस्ती क्षेत्रातील जाणकारांनी त्यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
राहुल मुळे यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, कुस्ती प्रशिक्षक, मित्रपरिवार आणि जिल्ह्यातील विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी स्पर्धेत त्यांनी जोरदार कामगिरी करून धाराशिव जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 💪🥇






