नळदुर्ग / प्रतिनिधी :
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे असलेल्या श्री हनुमान मंदिरातील प्राचीन हनुमान मूर्तीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून विटंबना केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून नागरिकांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.
माहितीनुसार, निलेगाव येथील श्री हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून स्थापित असलेली प्राचीन मूर्ती अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे समोर आले. ही बाब लक्षात येताच गावातील नागरिक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात जमा झाले आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकारामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेचे काही फोटो व माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामागे काही समाजविघातक प्रवृत्तींचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज, निलेगाव यांच्या वतीने नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये घटनेची तात्काळ सखोल चौकशी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे आणि या प्रकारातील दोषींना लवकरात लवकर शोधून भारतीय दंड संहितेनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
सदर घटनेमुळे निलेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे लक्ष आता पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लागले आहे.






