अणदूर ते नळदुर्ग.या जुन्या रस्त्याच्या प्रश्नावरून आता आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येत असून, महाविकास आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. येत्या रविवारी दिनांक १७ रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग येथील संविधान चौकात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
अणदूर ते नळदुर्ग दरम्यानचा जुना रस्ता सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच विद्यार्थ्यांना या रस्त्याच्या अभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून घेत तातडीने रस्ता सुरू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला हा प्रश्न असल्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा आणि आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.






